Monday, March 1, 2010

अंधाराचा आवाज

निरस माणसांच्या वस्तीतला,
प्रकाशही वाटतो भकास
व्हिस्कीचा ग्लास आणि तंगड्या पसरून
रानातल्या हाराकिरीचा केवळ कयास ,
कान आसुसले ऐकण्यासाठी आता अंधाराचा आवाज

बुरुजामागून येणाऱ्या झुळूकीवर
फुलल्या कारवीचा वास
आणि सळसळणाऱ्या गवताचा
ओलाकांचा हिरवा सुवास
कान आसुसले ऐकण्यासाठी अंधाराचा आवाज

हिरड्याच्या झाडावरील घुबडाचा हुमा
देऊन जाई चेटकीचा आभास
काताळावरल्या रातव्याचा चुकार
एकटा करून जातो मनास
कान आसुसले ऐकण्यासाठी अंधाराचा आवाज

नक्षत्रांच्या काफिल्यातील ध्रुवतारा
अढळ असल्याचा त्याला मिजास
ढगांच्या पडद्यामागून पृथ्वी न्याहाळण्याचा
चांदण्यांचा अट्टाहास
कान आसुसले ऐकण्यासाठी अंधाराचा आवाज

दिवसभर पंखावर असणाऱ्या पाकोळ्याना
रात्रीदेखील कसली असते तलाश
बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या
जुन्या आंब्यावर काजव्यांची आरास
कान आसुसले ऐकण्यासाठी अंधाराचा आवाज

खोट्या खोट्या हसण्याला कंटाळलेल्या
वेड्या मनाच्या वेड्या आकांक्षांना
शब्द-बंध करायचा
वेडा प्रयास
कान आसुसले ऐकण्यासाठी अंधाराचा आवाज

No comments:

Post a Comment